Adsense

तू पहिले घराकडं बघ....!! | Blog Post by Snehal Akhila Anvit


सोनूची आजी बाहेरच्या हॉलमध्ये भाजी निवडत बसली होती.दहा वर्षांची सोनू तिच्या अवती भोवती भिरभिरत होती.

तिला उगाचच इकडनं तिकडं फिरताना पाहून आजी म्हणाली, ये की जरा भाजी निवडायला!!

त्यावर सोनू म्हणाली, मी नाही निवडणार भाजी बिजी.

आजी म्हणाली, का ग मोठं होऊन तर हेच करायचंय ना? त्याच जन्माला आलीयेस की!!

मी नाही करणार मोठी झाली तरी, मला घर बांधायचीयेत मोठं होऊन!! मी छान छान घरं बांधणार!!, सोनू उत्साहात म्हणाली.

अगं, घरं बांधशील ती बाहेर, स्वतःच्या घरी कामं कोण करेल, तुलाच करावी लागतील की?

करेल दुसरं कोणी, मी नाहीच करणार

मग तुझा नवरा उपाशी राहणार.......

त्याचं तो करून खाईल नाहीतर बसेल तसाच!!

काय ग बाई बोलणं ते? मनीषा ऐकलस का तुझी लेक काय बोलतेय तेss, आजीने आवाज वाढवून तिच्या आईला सुनावलं.

हो सगळं ऐकलं. बघा ना मी लहान असताना माझी आई- आजी पण हेच म्हणायच्या, जरा घरातली काम कर, मोठेपणी तेच करायचं आहे. आणि आज तीस वर्षानंतरही मला मुलीसाठी तेच ऐकायला मिळतंय. मुलींनी वर्षानुवर्षे फक्त काय हेच करत बसायचं का? सगळ्यांची इच्छा हिच मुलींनी एका साच्यातच रहावं फक्त. तो कधी बदलुच नये, यावेळी मनीषाने मनातलं काढायची संधी सोडली नाही.

मला वाटतं मुलींनी पहिले घराकडे बघावं, मग बाकी सगळीकडे. घरातल्या माणसांना सुखी समाधानी ठेवणं हे तिचं पहिलं कर्तव्य, सोनूची आजी ठसक्यात म्हणाली.

हो ना!! शिकायचं तेवढं शिक. चांगली नोकरी कर. आणि तारेवरची कसरत करून नोकरीही सांभाळ आणि घरही बघ. कितीही मोठ्या हुद्द्यावर पोचलीस तरी घराकडे दुर्लक्ष होता कामा नये. हिच शिकवण सतत द्यायची ना मुलींना?

तू तर लगेच भांडायलाच लागलीस ग! तुला काय टोचलं एवढं?

मला बरच काही टोचलं हो. माझं शिक्षण तुमच्या मुलापेक्षा जास्त होतं. प्रेमविवाह होता म्हणून मी ते मनावर घेतलं नाही. पण तुमच्या ह्या पहिले घराकडे बघायचं या विचारसरणीमुळे मी माझं करियर खुंटवून घेतलं. प्रत्येक सणवाराचा थाट तुम्हाला साग्रसंगीत हवा होता. सुट्टी असेल तर ठिक, नसेल तर जीवाची धावाधाव झाली तरी चालेल, पण कुठल्याही गोष्टीत तुम्हाला कुचराई चालायची नाही. मी प्रोजेक्ट मध्ये येणाऱ्या अडचणी सोडवत असायचे, आणि तुम्ही फोन करायचात, आज संकष्टी आहे, मोदक करायचे आहेत माहिती आहे ना, लवकर निघ जरा.मला काही इंटरेस्ट नसायचा त्यात, दिवसभराच्या हेक्टिक शेड्युलने मोदक काय स्वैपाक करायची पण माझी इच्छा नसायची. पण घराकडे बघितलं पाहिजे, ह्या विचारांचा मारा मला ना ऑफिसमध्ये सुखाने राहू द्यायचा ना घरामध्ये!! प्रेस्टीजीयस प्रोजेक्टसाठी आऊट ऑफ इंडिया जायला मिळणार होतं, तिथेही वाट अडवलीत माझी, घराला वाऱ्यावर सोडून जाणार का म्हणून?

पुढे कुठल्या प्रोजेक्टसाठी माझं नाव विचारातच घेतलं गेलं नाही.घराकडे बघायला पाहिजे म्हणून माझ्या स्वप्नांनाच मी वाऱ्यावर सोडून दिलं.

वा ग वा, आमच्यावर नाव टाकून मोकळी झालीस की तू? तुला दोन्ही डगरीवर पाय ठेवणं झेपलं नाही ते सांग की?

हो नाहीं झेपलं मला, कारण एक डगर मला सारखी खाली खेचत होती. तिनं इतक्यांदा आपटवलं की माझा उभं राहण्याचा आत्मविश्वासच हरवून बसले मी.

आता सोनूला तरी घेऊ देत भरारी घ्यायची तेवढी. तिला नको ना अडवायला घराकडं बघ म्हणून. उलट वेळ येईल तेव्हा तिच्यासाठी तिला उडायला प्रोत्साहन देणारच घर शोधू आपण!!

आणि घराकडे तर घरातल्या सर्वच माणसांनी बघायला पाहिजे ना? एकट्या सुनेलाच का घराकडं बघायचा धाक?? तिनं तिचं सगळं मागे टाकून घराकडे बघितलं पाहिजे हा अट्टाहास सोडायला हवा ना आता.

आग लागो तुमच्या त्या नविन विचारसारणीला, आम्हाला नाही पटत असलं काही........ सुनेचं नोकरी करणं पटतं, तिने घर चालवणं पटतं, पण तिला मोकळीक मिळालेली चालत नाही, बरोबर ना? जाऊ दे, माझं झालं ते झालं. माझ्या मुलीचं मी ते होऊ देणार नाही. दुसऱ्यांची घर बांधता बांधता तिचं घर डगमगायला लागलं, तर ते सावरायला मी तिला लागेल तेवढी मदत करेन.

पण तिचं स्वप्न कधीच मागे पडू देणार नाही, काहीही झालं तरी नाही.......!!


©️ स्नेहल अखिला अन्वित

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post