Adsense

 


राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळं औषधे व आरोग्य सुविधांची टंचाई अधिक भेडसावू लागली आहे. जिल्ह्याजिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं असून बीड जिल्ह्याकडं लक्ष देण्याची विनंती केली आहे. हे पत्र ट्वीट करताना पंकजा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे. 

आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र पंकजा यांनी ट्वीट देखील केलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी बीड जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती टोपे यांना दिली आहे. 'बीड जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. परिस्थिती चिंताजनक आहे. आतापर्यंत ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार ९८९ लोक आतापर्यंत बाधित झाले आहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत असली तरी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळं रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. पुरेशी लस नसल्यानं लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. या साऱ्याकडं आपण जातीनं लक्ष द्यावं व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावं,' अशी विनंती पंकजा यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Previous Post Next Post