बाईकवर बसवून बापाला रानात नेलं ....

 

"तुम्ही दारु पिऊन आईला का त्रास देता" असा जाब पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाला विचारला. त्यानंतर त्याच्या अंगावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. ही खळबळजनक घटना बीडच्या साळेगाव परिसरातील माळरानावर घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी केशव हंकारे (वय ५५ वर्ष, रा. जवळबन ता. केज) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर पवन शिवाजी हंकारे (वय २६ वर्ष) असे आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपी पवन हंकारे याने त्याचे वडील शिवाजी हंकारे यांना जवळबन येथून दुचाकीवर बसवून साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू प्यायले.


त्यानंतर आरोपी पवन याने त्याचे वडील शिवाजी हंकारे यांना "तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता?" असा जाब विचारला. या दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि मुलगा पवन याने जन्मदात्या बापाच्या हातावर, पायावर, मानेवर आणि तोंडावर कोयत्याने ९ ते १० वेळा सपासप वार केले. त्यामुळे अतिरक्तस्रावाने शिवाजी हंकारे यांचा जागीच मृत्यू झाला.

या खळबळजनक घटनेनंतर आरोपी पवन याने मयत वडिलांचा मृतदेह, शेतातील सोयाबीनच्या भुसकटात झाकून लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी पवन हा स्वतःच युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. आपणच वडिलांचा खून करून मृतदेह केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळेगाव शिवारात लपवून ठेवले असल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात जन्मदात्या बापाची हत्या करणाऱ्या आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खेड्यातील कुटुंब कसे उद्ध्वस्त होत आहेत? त्या कुटुंबातील कलह आज खुनापर्यंत जाऊन टेकला आहे. त्यामुळे अशा दारुवर सरकार आणि प्रशासनाने बंदी आणावी अशी मागणी गाव खेड्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.