भाजपा काळात अत्याचारात वाढ! काँग्रेस प्रवक्ते राजहंस

भाजपा काळात अत्याचारात वाढ! काँग्रेस प्रवक्ते राजहंस

मुंबई प्रतिनिधी:- नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे दलित व मुस्लीम समाजाच्या दोन मुलांना केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना पुरोगामी महाराष्ट्राला चिंता करायला लावणारी आहे. रामटेक घटनेत पोलीसांनी काही जणांना अटक केली असली तरी मंदिर प्रवेशावरून मरेपर्यंत मारहाण करण्याची मानसिकता महाराष्ट्रात निर्माण होणे हेच अत्यंत गंभीर आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून दलित, मागास व अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढले आहेत, असा आरोप मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.

मागील दीड वर्षात अल्पसंख्याक व दलित समाजावरील हल्ले वाढले आहेत. नाशिकमध्ये मंबईतील कुर्ल्यातील मुस्लीम तरुणाचा झुंडशाहीने बळी घेतला, नांदेड जिल्ह्यात लग्नाच्या वरातीत आला म्हणून अक्षय भालेराव या दलित तरुणाची हत्या करण्यात आली. लातूरमध्ये किरकोळ कारणावरुन दलित तरुणाची हत्या करण्यात आली. नाशिकमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून हत्या करण्यात आली. नवी मुंबईत आंतरजातीय विवाहावरून दलित तरुणाची हत्या करण्यात आली. या घटना मनाला सुन्न करणाऱ्या आहेत, भाजपा सरकारच्या काळातच या समाज घटकांवर हल्ले होत असताना सरकारकडून कठोर पावले उचलली जात नाहीत. मागासवर्गिय, दलित, अल्पसंख्याक समाज भितीच्या सावटाखाली जगत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांनी याकडे गांभिर्याने लक्ष देऊन या समाज घटकाला आश्वस्त करण्याची गरज आहे. राज्य सरकारने कडक कारवाई करुन सामाजिक एकोपा राखला जाईल यासाठी काम करण्याची नितांत गरज आहे.

नागपूर हा गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह जिल्हा आहे. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशी घटना घडावी यातून राज्यातील कायदा सुव्यवस्था किती बिघडली आहे हे दिसते. दलित, अल्पसंख्याक, मागास, महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील हजारो महिला व मुली बेपत्ता आहेत त्याचा शोध घेण्यात गृहखाते अपयशी ठरले आहे. पुण्यासारख्या शहरात कोयता गँग फोफावली आहे. गुन्हेगार मोकाट असून कायद्याचा धाक राहिलेला नाही असे चित्र आहे, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow