डॉ आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला हात लावाल तर याद राखा! काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस

डॉ आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला हात लावाल तर याद राखा! काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस

बीड प्रतिनिधी:- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला सर्वश्रेष्ठ असे संविधान दिले आहे. हजारो वर्षांनंतर वंचित, मागास, दलित समाज घटकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला व हा घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात आला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्या मुशीत जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षाला मात्र हे संविधानच मान्य नाही. हे संविधान बदलण्याचा घाट घातला जात आहे पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला हात लावाल तर याद राखा, देशभरातील आंबेडकरी विचाराचे लोक हा डाव हाणून पाडतील, असा इशारा काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिला आहे.

भाजपा व संघ परिवारातील लोक सातत्याने संविधान बदलण्याची जाहीर विधाने करत असतात. आताही पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी संविधान बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी संविधानाचा मुळ गाभा बदला अशी मागणी केली आहे. रंजन गोगोई निवृत्ती नंतर भाजपाच्या तिकिटावर राज्यसभा खासदार झाले आहेत. संविधान बदलण्याची भाषा भाजपा व संघ या लोकांच्या माध्यमातून करत असते.

आरएसएसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान मान्य नाही, देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा मान्य नाही. तर काही लोकांना देशाला स्वातंत्र्य २०१४ नंतरच मिळाले असे वाटत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व त्याग केलेल्या हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे. या लोकांचा बोलविता धनी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे लपून राहिलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य चळवळीत काहीही योगदान नाही. संघाला देशात पुन्हा एकदा जातव्यवस्था आणायची आहे, संविधान नाही तर मनृस्मृतीनुसार देश चालला पाहिजे असे तारेही तोडणारे लोक याच विचारसरणीचे आहेत.

 देशात मागील ९ वर्षांपासून सामाजिक विष पेरण्याचे काम सुरु असून २०२४ नंतर भाजपा सत्तेत आले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत त्यामुळे देशभरातील आंबेडकरी विचारांच्या लोकांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारून पराभव करून आंबेडकरी हिसका दाखवा असे आवाहनही सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow