धनादेश न वटल्याच्या आरोपातून विलास उगले याची निर्दोष मुक्तता
बीड:- (प्रतिनिधी) (दि.०१-१०-२०२३) याबाबत विस्तृत वृत्त असे की, बीड येथील चौथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी नामे विलास खंडू उगले याची धनादेश न वटल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी नामे मंथन आप्पाराव ठाकर हिने आरोपीस मे २०१६ मध्ये सौर ऊर्जा विक्रीचा व्यवसाय करणेसाठी स्वत: रक्कम रु.४,५०,०००/- (चार लाख पन्नास हजार रु.) हातउसने म्हणून दिले, तसेच फिर्यादी समक्ष फिर्यादीचा भाऊ सुदाम ठाकर व मेव्हणे शंकर हाकाळे यांनी देखील आरोपीस व्यवसायासाठी प्रत्येकी रु.४,५०,०००/- उसने म्हणून दिले होते, असे कथन केले होते.
सदर प्रकरण मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, बीड यांचेपुढे चालले. सदर प्रकरणात फिर्यादीच्या वतीने एकूण दोन साक्षीदार तपासण्यात आले होते तर आरोपीच्या वतीने बचावासाठी त्याने स्वतःची साक्ष नोंदविली होती. यामध्ये आरोपीच्या वतीने घेतलेला बचाव व त्या बचावा प्रमाणे फिर्यादी व साक्षीदार यांचा घेतलेला भक्कम असा उलटतपास या सर्व बाबांचे मा. न्यायालयाने सुक्ष्मपणे अवलोकन करून व सदर प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून आरोपी तर्फे घेण्यात आलेला बचाव खरा असल्याचे निष्पन्न झाल्याने मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ४ थे, बीड यांनी आरोपी विलास उगले याची सदर प्रकरणातून दि. १६-०९- २०२३ रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. बाळासाहेब गायकवाड यांनी केलेला युक्तीवाद व घेतलेला अभ्यासपुर्ण बचाव तसेच पुराव्यांचा विचार करता मा. न्यायालयाने आरोपीची सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. सदरील प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. बाळासाहेब गायकवाड यांनी काम पाहिले व त्यांना सदर प्रकरणात अॅड. सागर नाईकवाडे, अॅड. शामसुंदर शिंदे, अॅड. लहू बागलाने, अॅड. त्रिंबक जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
What's Your Reaction?