शिंदे सरकारच्या बाबतीत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला या वर्षी २० जूनला एक वर्ष पूर्ण होणार आहे. १९ तारखेला शिवसेनेचे दोन मेळावे पार पडणार आहेत. एक शिंदे गटाचा तर दुसरा ठाकरे गटाचा. शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशात आता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरुन शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. गद्दार सरकारची वर्षपूर्ती आहे. सांभाळून राहा, २० जूनला कुणाला रॅडिसन हॉटेलचं तिकिट दिलं तर जाऊ नका असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
गद्दार सरकारची वर्षपूर्ती आता येते आहे. पण तुम्ही सगळे सांभाळून राहा. २० तारखेला कुणाला तिकिट दिलं गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलचं तर जाऊ नका. तुम्ही विचार करा गद्दारी करायला प्रायव्हेट प्लेन लागलं, फाईव्ह स्टार हॉटेल लागलं. गद्दारी करताना कुणाला असं वाटलं नाही की आपण आपल्या मतदारसंघात जावं, गावातल्या लोकांना मिटिंग घेऊन सांगावं की मी असा निर्णय घेतला आहे. तुम्ही माझ्या मागे उभे राहा. का नाही असं केलं? तुम्ही पक्ष बदलला, सरकार पाडलं, विचारधारा बदलली पण एकालाही वाटू नये? की आपल्या मतदारसंघात जावं.”
सगळे तिकडे गुवाहाटीत जाऊन बसले होते. तिकडे मजा चालली होती. कुणी शॉर्ट्स घातल्यात, कुणी एकमेकांना मिठ्या मारत होते. सुट्टीला गेले होते की देशाच्या सेवेसाठी? काल एक बातमी वाचली की भाजपाने शिंदे सरकारला सांगितलं आहे की पाच मंत्री घालवा. मी विचार करते आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस इतकी वर्षे सत्तेत होते. काँग्रेसने कधी सांगितलं नाही तुमचे मंत्री कोण करा ते. काँग्रेसने त्यांचे मंत्री करावे, आपण आपले करतो. मला आता विचार करुन सांगा उद्धवजी म्हणतात की हे मिंधे सरकार आहे हे मला हळूहळू पटतंय. का? पक्ष कुणी स्थापन केला? उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी. पक्ष हयात असताना कुणाला दिला तर उद्धव ठाकरेंना, मग तुम्ही पक्ष कोणत्या अधिकारात घेतला?” असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.
What's Your Reaction?