तुम्हाला सिमकार्ड बंद करण्याचा फोन आलाय? मग सावधान!

तुम्हाला सिमकार्ड बंद करण्याचा फोन आलाय? मग सावधान!

कोरोनामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असतानाच सायबर ठगांच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे नागरिकांना फसविण्याचे प्रकार वाढत आहेत. 

अशातच कागदपत्रे अपुरे आहेत, कार्ड जुने झाले आहेत अशी विविध कारणे देऊन सिमकार्ड बंद करण्याची भीती घालून फसवणुकीचा धंदा जोर धरू लागला आहे. 

मुंबईत नुकतेच एका वयोवृद्ध डॉक्टरला सिमकार्डसाठी दहा लाख गमाविण्याची घटना ताजी असतानाच खारमधील ७६ वर्षीय आजोबांना पावणे तीन लाखांना फटका बसला आहे.

 वांद्रे परिसरात राहणारे ७६ वर्षीय मोहनबीर चंदेलसिंग यांना २४ जानेवारी रोजी व्होडाफोनमधून बोलत असल्याचे सांगून सीमकार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. 

मोबाईल क्रमांक सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर पाठविलेल्या लिंकमध्ये माहिती भरण्यास सांगितले. गुगल पेबाबतही विचारणा केली. 

 गुगल पे नसून नेटबँकिंग असल्याचे सांगताच, ठगाने त्यांना दहा रुपये ऑनलाईन व्यवहार करण्यास सांगितला. ते पैसे पुन्हा मिळणार असल्याचे सांगताच, त्यांनी विश्वास ठेवून पैसे पाठविले. 

काही मिनिटात त्यांच्या खात्यातून २ लाख ८५ हजार रुपये काढल्याचा संदेश मोबाईलवर आला. तब्येत ठीक नसल्याने त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहता आले नाही. 

अखेर, नुकताच पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. त्यामुळे त्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

नागरिकांनी 'हे' करावे : 

● कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून खासगी माहिती शेअर करू नये. 

● येणाऱ्या कॉल, संदेशाबाबत अधिकृत ठिकाणी जाऊन खातरजमा करावी. 

● कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लीक करू नये. 

● कोणत्याही कॉलबाबत संशय येताच जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow