नेत्रविकाराकडे करु नका दुर्लक्ष, जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे
नेत्रपटल हे असे एकमेव अवयव आहेत, की ज्यातील रक्तवाहिन्या स्पष्टपणे उघड्या डोळ्यांनी पाहता येतात.
नेत्रपटल हे असे एकमेव अवयव आहेत, की ज्यातील रक्तवाहिन्या स्पष्टपणे उघड्या डोळ्यांनी पाहता येतात. म्हणूनच डोळ्याला शरीराची खिडकी मानले जाते. शरीराला जडणार्या उच्च रक्तदाब, मधुमेह अशा अनेक व्याधींचे डोळ्यांवर दुष्परिणाम होतात.
आपला डोळा एखाद्या कॅमेर्याप्रमाणे कार्य करतो. किंबहुना डोळ्याच्या रचनेचा अभ्यास करूनच कॅमेरा विकसित करण्यात आला आहे. डोळ्याचे बुब्बुळ म्हणजे एक बहिर्वक्र भिंग असते. या भिंगामुळे बाहेरचा प्रकाश किंवा द़ृश्याची प्रतिमा डोळ्याच्या मागील बाजूस असलेल्या पडद्यावर (नेत्रपटल किंवा रेटिना) केंद्रित केली जाते. पडद्याच्या मागे एक नस असते. ही नस ती प्रतिमा मेंदूपर्यंत वाहून नेते. त्यामुळेच आपण ते द़ृश्य पाहू शकतो. हा पडदा कॅमेर्याच्या रिळाप्रमाणे काम करतो. बुब्बुळ आणि पडदा यांच्यामध्ये एक द्रवपदार्थ असतो. डोळ्याच्या कार्यक्षमतेसाठी या द्रवपदार्थाचा दाब (इंट्रा-ऑक्युलर प्रेशर) ठराविक मर्यादेत असणे आवश्यक असते. डोळ्याच्या पापण्यांमध्ये नेत्रनलिका असून, त्यातून येणार्या अश्रुंमुळे डोळ्याचा पृष्ठभाग ओला ठेवला जातो. हे सर्व अवयव पारदर्शक असतात. यातील एखादा अवयव कमजोर झाला तरी द़ृष्टिदोष उद्भवतो.
चांगल्या द़ृष्टीसाठी नेत्रपटल सुद़ृढ असणे महत्त्वाचे असते. नेत्रपटल मज्जातंतूंचे बनलेले असते. हे मज्जातंतू मृत झाल्यास त्यांची पुनर्निर्मिती होऊ शकत नाही. या मज्जातंतूंना इजा झाल्यास उद्भवणारा द़ृष्टिदोष पूर्ण बरा होऊ शकत नाही. त्यामुळे द़ृष्टीचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. म्हणूनच डोळा हा खूप नाजूक अवयव मानला जातो. नेत्रविकाराची महत्त्वाची लक्षणे म्हणजे डोळा दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळा लाल होणे, धूसर दिसणे किंवा डोळ्यासमोर काळे डाग दिसणे. ही लक्षणे म्हणजे पुढे डोळ्यांवर होणार्या गंभीर परिणामांसाठी धोक्याची घंटाच असते. बरेचदा ही लक्षणे म्हणजे हिमनगाचं केवळ एखाद्ये टोक असू शकतात. त्यामुळे डोळ्याच्या तक्रारींकडे थोडे दुर्लक्ष केले तरी ते महागात पडू शकते. अनेकदा नेत्रविकारांची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. अशा वेळी विकाराचे निदान होईपर्यंत बराच उशीर झालेला असू शकतो. एकूणच डोळा हा प्रकाशाने उद्दिपित होणार्या (लाईट सेन्सिटिव्ह) पेशींनी बनलेला असतो. या पेशी नसांच्या (नर्व्हज) साह्याने एकमेकींशी जोडलेल्या असतात. या नसांमुळे डोळ्यात आलेल्या प्रकाशाचे (द़ृश्यांच्या प्रतिमांचे) मेंदूला समजेल अशा विद्युत संकेतांमध्ये (इलेक्ट्रिकल सिग्नल्स) रूपांतर केले जाते.
डोळ्यामध्ये किती प्रमाणात प्रकाश येऊ द्यायचा हे बुब्बूळ ठरवते. हा प्रकाश (प्रतिमा) भिंगाच्या साह्याने नेत्रपटलावर (रेटिना) पाडली जाते. नेत्रपटलदेखील प्रकाशाने उद्दिपित होणार्या पेशींपासूनच बनलेले असून, समोरचे द़ृश्य आपल्याला कसे दिसावे हे नेत्रपटल ठरवते. नेत्रपटलाला रक्तपुरवठा करण्यासाठी केशवाहिन्यांचे जाळे असते. नेत्रपटल हे असे एकमेव अवयव आहे, की ज्यातील रक्तवाहिन्या स्पष्टपणे उघड्या डोळ्यांनी पाहता येतात. म्हणूनच डोळ्याला शरीराची खिडकी मानले जाते. शरीराला जडणार्या उच्च रक्तदाब, मधुमेह अशा अनेक व्याधींचे डोळ्यांवर दुष्परिणाम होतात. त्यामुळे डोळ्याची नियमित तपासणी केल्यास या व्याधीचेही निदान होऊ शकते आणि डोळ्यावर होणारे दुष्परिणामही रोखता येतात.
बरेचदा नेत्रपटलाशी संबंधित विकारांचे निदान होईपर्यंत डोळ्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झालेले असते. या विकारांची सुरुवात साधारणत: नेत्रपटलाच्या मध्यबिंदूच्या अवतीभोवती होते. त्यामुळे सुरुवातीला द़ृष्टीमध्ये फरक पडल्याचे रुग्णांना जाणवत नाही. मात्र, हे विकार मध्यबिंदूवर पोहोचतो, तेव्हा भुरकट दिसायला सुरुवात होते. नेत्रपटलाच्या मज्जातंतूंना इजा झाल्यास ती इजा भरून निघत नाही, त्यामुळे अशा वेळी द़ृष्टी उपचारांनंतरही पूर्ववत होत नाही. त्यामुळे विशेषत: वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येकाने डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यायला हवी. नेत्रपटलाशी संबंधित विकारांच्या निदानासाठी नेत्रपटलतज्ज्ञ (रेटिना स्पेशालिस्ट) डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे असते. नियमित नेत्रतपासणी केल्यास नेत्रपटलाला होऊ शकणार्या व्याधींचे वेळेत निदान होऊन व्याधी आटोक्याबाहेर जाण्यापूर्वीच त्यावर उपचार करणे शक्य होते आणि त्यामुळे द़ृष्टीचे कायमचे होऊ शकणारे नुकसान टाळले जाऊ शकते.
What's Your Reaction?