संशय आणि भासाने ग्रस्त आहात, काय आहे ओसीडी आजार?

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा आजार ज्या व्यक्तींना होतो त्या संशय आणि वेगवेगळ्या भासाने ग्रस्त असतात.

संशय आणि भासाने ग्रस्त आहात, काय आहे ओसीडी आजार?
डॉ. महेश बरामदे

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा आजार ज्या व्यक्तींना होतो त्या संशय आणि वेगवेगळ्या भासाने ग्रस्त असतात. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करून पाहण्याची सवय त्यांना असते. अनेकदा हा आजार लक्षात येत नाही आणि आला तरी चुकीच्या समजुतींमुळे उपचारही घेतले जात नाहीत. वेळीच उपचार घेतले, तर या रोगावर पूर्णपणे ताबा मिळवता येतो.

ओसीडी (OCD) म्हणजे अ‍ॅाब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर नावाचा आजार ज्याला होतो ती व्यक्ती संशय आणि भास याने ग्रस्त होते. अशी स्थिती कुटुंबातील व्यक्तींना तसेच सभोवतालच्या व्यक्तींना खूप अडचणीची ठरते. यामध्ये अनेकांना सतत संशय असतो की, आपण आपले काम पूर्ण केले की नाही? एक चिठ्ठी लिहून ती वारंवार तपासणे, लहानशी चूक असेल, तर ती पुन्हा लिहिणे अशा प्रकारे एकच चिठ्ठी पाच-सहा तास ते लिहीत बसतात. इतकेच नाही, तर घरी आल्यावर वाटते की, आपण ऑफिसचा दरवाजा बंद केला की नाही, ते तपासण्यासाठी पुन्हा जाणे, काहींना वाटते आपल्या हातांना घाण लागली आहे. त्यामुळे ते वारंवार हात धुतात. इतकेच नाही, तर विनाकारण विचारांच्या जाळ्यात ते अडकून राहतात. वास्तविक, मेंदूच्या आत सेरोटोनिन नावाचे रसायन असते आणि जेव्हा ते मेंदूमध्ये कमी होते, तेव्हा कोणतेही काम करताना मनात अपूर्णतेची भावना निर्माण होते आणि अशा स्थितीत ती व्यक्ती आवश्यकतेपेक्षा अधिक सतर्क होते.

अशा सवयी असणे हे एका मनोरोगाचे लक्षण आहे. हा रोग म्हणजेच ओसीडी. बरेचदा अशा रोगाबद्दल बोलताना लोक बिचकतात. कारण, समाजात अशी धारणा रुळलेली आहे की, मनाशी निगडीत कुठलाही आजार हा वेडेपणाशीच निगडीत असतो आणि संबंधीत व्यक्तीला वेडे ठरवले जाते. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. खरे तर, मनोरोगाचा इलाज हा इतर आजारांच्या इलाजाप्रमाणेच शक्य आहे. हा आजार असणार्‍यांना काही वेळा वाटते की, या गर्दीत एखाद्याच्या थोबाडीत मारावी. काहीवेळा त्यांना खूप शिव्या द्याव्याशा वाटतात. दुसर्‍यांना दु:खी बघण्याची इच्छा, स्वच्छतेबाबत अधिक जागरुकता निर्माण होणे, वारंवार स्नान करणे किंवा घराची स्वच्छता करत राहणे, वस्तू योग्य पद्धतीने ठेवण्यास खूप वेळ लावणे, कुठलीही वस्तू फेकायची इच्छा न होणे, खूप कचरा जमवून ठेवणे अशी अनेक लक्षणे यामध्ये दिसतात.

अशा मानसिकतेमागचे शास्त्रीय कारण म्हणजे मेंदूमधील सिरोटोनिन नावाच्या तरल पदार्थाचे असंतुलन होणे हे आहे. यावर उपचार आहेत. सिरोटोनिन पुरेशा प्रमाणात औषधामार्फत देऊन ते संतुलित केले जाऊ शकते. यामुळे ओसीडी हा आजार बरा होऊ शकतो. हे औषध तज्ज्ञांच्या मार्गदशनाखालीच दिली जातात. तसेच त्यासोबत समुपदेशनाद्वारेही इलाज केला जातो. या व्यर्थ विचारांपासून, कृतीपासून कसे दूर जायचे, याबाबत समुपदेशनात सांगितले जाते. त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञच आवश्यक असतो.

बर्‍याचदा रुग्णाला अशा विचारांमधली निरर्थकता पटत असते. मात्र, असे विचार मनावर स्वार होतात. हे विचार भास, संशय, भ्रम या संबंधित असतात. वारंवार कुलूप लागले आहे का? ते ओढून बघणे, एचआयव्हीची बाधा तर झाली नाही ना? शेवटची ओळ व्यवस्थित वाचली का? कोणीतरी माझ्या मागे लागले आहे. त्यांना माझे नुकसान करायचे आहे, चालताना वारंवार मागे वळून पाहणे, अशी काही लक्षणे ओसीडी या आजारात दिसून येतात. मात्र, वेळीच उपचार केले, तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. हे लक्षात घेऊन असे मानसोपचार करून घेण्यात कुठलाही कमीपणा वाटून घेऊ नये. (OCD)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow